वाचला असेल तुका, तर राहू नकोस मुका !

वाचला असेल तुका, तर राहू नकोस मुका !

- अविनाश पाटील

भले तर देऊ कासेची लंगोटी 
नाठाळाचे माथी हाणू काठी

मराठी जणांचा स्वाभिमान, अस्मिता आणि वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस म्हणजे संत तुकाराम होय. सर्जकतेला चारित्र्य आणि कृतीची जोड असेल तर ते कार्य अजरामर होते. संत तुकाराम महाराज एक सत्यशोधक विचारांचे विद्रोही साहित्यिक. समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा आणि धर्माच्या नावावर चालणाऱ्या कर्मकांडाचा त्यांनी आपल्या अभंगातून समाचार घेतला. विवेक आणि तर्कशील चिंतनातून अभ्यासपूर्ण साहित्याची निर्मिती करणारे जगदगुरु तुकोबाराय महाराष्ट्राच्या संत साहित्याचे विद्यापीठ आहेत. प्रस्तुत अभंगाच्या ओळी अन्यायाविरुद्ध वाचा फोडणाऱ्या आहेत. तुम्ही आमच्या सहिष्णुतेचा अंत पाहू नका. वेळ आल्यास आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. असे डिप्लोमॅटिक उत्तर देणारे तुकाराम महाराज हे पहिले मुत्सद्दी होते असे म्हणावे लागेल. त्यांनी समाजाच्या तत्कालीन अन्यायावर, भ्रष्टाचारावर आणि मूर्तिपूजा यांच्या विरोधात कठोर शब्दांत टीका केली. तुकाराम महाराजांचा संदेश मुख्यतः प्रेम, तत्त्वज्ञान, आणि समतेचा होता. त्यांच्या काव्यात आणि अभंगांत त्यांनी अत्याचार, सामाजिक विषमता यावर प्रखरपणे प्रतिकार केला. 

आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें ।
शब्दाचींच शस्‍त्रें यत्‍ने करूं ॥१॥

शब्द, काव्य, वचने आणि साहित्याच्या परिप्रेक्ष्यात रममाण होणारा कवी अशी ओळख संत तुकारामांची आहे. माझं ऐश्वर्य कशात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. माझी श्रीमंती माझे शब्द, माझं काव्य आणि माझी साहित्यसंपदा आहे. स्वतःच्या वैचारिक प्रगल्भलतेला शब्दांची रत्ने अशी उपमा देणारे तुकाराम महाराज आपल्या काव्यालाच शस्त्र असे संबोधतात. अशी श्रीमंती मिरवणारे ते एकमेव संत होय. भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक ज्ञान, उपदेश, आणि वचन हेच खरे धन आहेत. "शब्द" हेच त्यांचे शस्त्र आहे, ज्याद्वारे ते जीवनातील अडचणी आणि चुकांना दूर करत आहेत. तुकाराम महाराजांनी आपल्या काव्यशैलीत साध्या भाषेत, मनाशी एकत्व साधणारी आणि अध्यात्मिक संदेश देणारी कविता केली. त्यांच्या अभंगांची लय, गहिरा अर्थ आणि भक्तिपंथाची गोडी ते अभंगांमध्ये प्रकट करतात.

तुकाराम महाराज विद्रोही होते का?

संत तुकाराम महाराजांचे अभंग हे मुख्यतः सामाजिक अन्याय, धार्मिक पाखंड, आणि भेदभावावर आधारित आहेत. ते नेहमीच समाजातील वाईट गोष्टींवर प्रहार करत आणि त्यावर जागरूकता निर्माण करत. त्यांच्या अभंगांतून समाजाला आरसा दाखवला गेला. मूळ प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन  समाजप्रबोधनाचे काम केले. समाजातील मूठभर लोकांची ज्ञानावर असलेली मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली.

वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।

चौकस अभ्यासू वृत्ती अंगी बाणवून शस्त्रांचा आणि वेदांचा अर्थ समजून घेणारे तुकाराम महाराज प्रस्थापितांच्या ज्ञान मक्तेदारीला उत्तर देताना प्रस्तुत अभंगाच्या ओळी त्यांच्या भाळी मारताना दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा खरा अर्थ, खरे रहस्य हे आम्हास ठाऊक आहे आणि इतर प्रस्थापित फक्त त्या ज्ञानाचा भार आपल्या माथी वाहतात. ते म्हणतात एखादा खाद्य पदार्थ फक्त बघून चालत नाही तर तो खावा लागतो तरच त्याची खरी चव कळते त्याप्रमाणेच वेदांचे देखील आहे. यातून तुकाराम महाराज ज्ञानाबाबत समाजातल्या विषमतावादी विचारांचा समाचार घेताना दिसतात. 

ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥
अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥

चारित्र्य आणि कृती यांच्याशी फारकत घेतलेली मंडळी जेव्हा तत्वज्ञानाचे आभाळ सृजन करू लागते, तेव्हा अशा भोंदू बाबांचा कसं पितळ उघडं पाडावं ते ह्या अभंगातून स्पष्ट होते. कुकर्म करणारी साधू मंडळी पाप करून स्वतःस बाबा म्हणवून घेतात. दिवसा राख फासून डोळे झाकून ध्यान करायचे आणि रात्री पापे करायची असा या लोकांचा व्यवहार. अशा संगीताच्या लोकांना आग लागो असं ह्या अभंगात तुकोबांनी म्हटले आहे. 

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या मते संत तुकाराम महाराज हे एक समाज सुधारक होते. त्यांनी आपल्या अभंगांद्वारे सामाजिक विषमता, उच्चवर्गीय मानसिकता, जातीभेद, आणि पाखंड यावर कठोर प्रहार केले. त्यांच्या अभंगांमध्ये प्रकट होणारा संदेश म्हणजे एकता, समानता आणि प्रेम हेच मानवतेचे मूलभूत तत्त्व आहेत. तुकाराम महाराजांचे साहित्य अत्यंत प्रभावी आहे. त्यांच्या अभंगांमध्ये जीवनाचे गहन तत्त्वज्ञान आहे. ते साध्या शब्दात, सहज आणि सहजतेने गाभ्याचं मर्म प्रकट करत होते. तुकारामांच्या अभंगांमध्ये आध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर आणि प्रभावी प्रतिकात्मक वर्णन आहे. त्यांच्या अभंगांमध्ये असलेले शुद्ध प्रेम, भक्ती आणि तत्त्वज्ञान आजही लोकांना प्रेरणा देतात.

संत तुकाराम महाराज यांचे जीवन आणि त्यांचे कार्य आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा भाग आहे. त्यांची वचने आणि अभंग आजही लाखो लोकांच्या जीवनात प्रेरणा देत आहेत. म्हणून आज तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त केलेला हा लेखन प्रपंच सार्थकी लागावा असं वाटत असेल तर तुकोबारायांच्या विचारांचा अंगीकार करावा आणि शेवटी एवढंच.... कळला असेल तुका....तर, राहू नकोस मुका!